सरदार पटेल महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप राजकिशोर गोंड विद्यापीठस्तरीय ‘उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी’ पुरस्काराने सन्मानित

Chandrapur Media 24



चंद्रपूर - गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या १४ व्या वर्धापनदिन सोहळानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात येथील सरदार पटेल महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप राजकिशोर गोंड यांना विद्यापीठस्तरीय ‘उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजप्रबोधन, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संरक्षण, आरोग्यविषयक जनजागृती आणि ग्रामीण भागात सेवा उपक्रम राबवण्यात डॉ. गोंड यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी कार्यामुळे त्यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली.      
                                
हा पुरस्कार पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते डॉ. कुलदीप राजकिशोर गोंड सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम. काटकर, रासेयो चे कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापकवृंद, शिक्षक, शिक्षकेत्तरकर्मचारी व स्वयंसेवकांनी डॉ. गोंड यांचे अभिनंदन केले असून राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे समाजासाठी करत असलेल्या कार्याची ही अधिकृत पातळीवरील पावती असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

आज मिळालेला सदर पुरस्कार माझ्या एकट्याच्या कामगिरीची नाही, तर आपण सगळ्यांनी मिळून उभारलेल्या सेवाभावाची पावती आहे. स्वतःला झोकून देणाऱ्या माझ्या प्रत्येक स्वयंसेवकाचे समर्पण या शिवाय ही ओळख पूर्ण झालीच नसती अशी प्रतिक्रिया गोंड यांनी दिली आहे.

दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल यांनी डॉ.गोंड यांचे अभिनंदन केले आहे.