भद्रावती तालुक्यातील विजासन रोड ते मुख्य देवालय सोसायटीपर्यंतच्या मुख्य रस्त्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून रखडले असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खडीकरण करून काम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.
तसेच पावसामुळे आणि वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे खडी उखडून रस्त्याच्या मधोमध उंचवटे तयार झाले आहेत. काही ठिकाणी खोल खड्डे पडल्याने दुचाकी वाहनचालक वारंवार घसरत असल्याच्या घटना घडत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रकाशाची अपुरी व्यवस्था आणि रस्त्याची खराब अवस्था यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढत आहे.
प्रसंगी स्थानिक नागरिकांच्या मते, खडीकरणानंतर तातडीने डांबरीकरण होणे अपेक्षित होते. मात्र संबंधित विभागाकडून कामाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या रस्त्यासाठी निधी मंजूर असूनही कामात होत असलेला विलंब संशयास्पद ठरत आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रखडलेले काम पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.


