*विरोधक, टीकाकार गप्प दृ प्रभाग ३ ;एमईएल मध्ये भाजपचे चारही उमेदवार दणदणीत विजयी*
प्रभाग क्रमांक ३ (एमईएल) मध्ये आमदार किशोर जोरगेवार यांनी दाखवलेले राजकीय धैर्य आणि दूरदृष्टी अखेर यशस्वी ठरली आहे. या प्रभागात त्यांनी चार उमेदवारांना तिकीट देण्याचा आग्रह धरला होता. या निर्णयाला पक्षांतर्गत पातळीवर विरोधही झाला होता. मात्र निकालाने आमदार जोरगेवार यांचा निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे सिद्ध केले आहे.
या प्रभागातून भारतीय जनता पक्षाचे जितेश कुळमेथे, नितेश गवळी, सविता सरकार आणि आशा देशमुख यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत मोठ्या फरकाने विजय संपादन केला आहे. चारही उमेदवारांचा एकत्रित विजय म्हणजे आमदार जोरगेवार यांच्या नेतृत्वावर जनतेने व्यक्त केलेला ठाम विश्वास मानला जात आहे.
प्रचारादरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रभागात सातत्याने भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. विकासकामे, मूलभूत सुविधा, नागरी प्रश्न तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. त्याचा थेट परिणाम मतदानावर दिसून आला.
विशेष म्हणजे, या प्रभागात स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देत सामाजिक समतोल राखण्याचा निर्णय आमदार जोरगेवार यांनी घेतला होता. त्याच निर्णयामुळे प्रभागातील विविध घटक एकत्र आले आणि महायुतीच्या उमेदवारांना भक्कम पाठिंबा मिळाला.
निकाल जाहीर होताच प्रभागात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, ढोल-ताशांच्या गजरात विजय साजरा केला. “आमदार जोरगेवार यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे, अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवारांनी व्यक्त केली. हा विजय केवळ चार उमेदवारांचा नसून, तो आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजकीय निर्णयक्षमतेचा, जनसंपर्काचा विजय असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.





