ता. मुल,दाबगाव १९ फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, दाबगाव (मक्ता) येथे सामान्य ज्ञान स्पर्धा बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने लेखी पेपर स्वरूपात शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक जाणीव, राष्ट्राभिमान तसेच स्पर्धात्मक परीक्षांची तयारी दृढ व्हावी, या उद्देशाने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती. निर्मला किरमे [सरपंच दाबगाव (मक्ता)] श्रीमती. मीना बुरांडे [शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दाबगाव (मक्ता)] व श्री. अतुल बुरांडे (ग्रामपंचायत सदस्य) उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्रीमती. मीना बुरांडे [शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दाबगाव (मक्ता)] व श्री. अतुल बुरांडे (ग्रामपंचायत सदस्य) यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महाराजांच्या पराक्रम, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व,
प्रशासनकौशल्य व स्वराज्य स्थापनेतील योगदानाचा उल्लेख केला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करून शिक्षणात प्रामाणिकपणा, शिस्त व कर्तव्यनिष्ठा जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.सदर स्पर्धा दोन गटांत — प्राथमिक व माध्यमिक — घेण्यात आली. प्रश्नपत्रिकेमध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य, युद्धनीती व सामाजिक दृष्टिकोन यांवरील बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश होता. प्रत्येक प्रश्नास चार पर्याय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी निश्चित वेळेत उत्तरपत्रिकेत योग्य पर्याय निवडून उत्तरे नोंदवली. स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर पार पडल्याने विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेचा अनुभव मिळाला. या सामान्य ज्ञान स्पर्धेत दाबगाव (मक्ता), चिचाळा, ताडाळा, सुशी, नलेश्वर, हळदी व केळझर अशा विविध गावच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
निकालानुसार प्राथमिक गटात प्रथम - कु. आरोही ईश्वर बुरांडे द्वितीय - कु. कोमल रामभाऊ चलाख व तृतीय - कु. भैरवी सुधाकर देउरमले यांनी क्रमांक पटकावले..
माध्यमिक गटात प्रथम - मंजित मारोती उराडे द्वितीय - डेव्हिड चिरंजीव गव्हारे व तृतीय - कु. सानिया संदीप येलुरे यांनी यश संपादन केले.समारोपप्रसंगी विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. एकंदरीत विद्यार्थ्यांच्या हितासाठी या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन कु. दामिनी रविंद्र बुरांडे यांनी केले; सोबतच सूत्रसंचालनाची जबाबदारी सुद्धा यशस्वीरित्या पार पाडली. आभार प्रदर्शन कुमारी देवयानी हजारे यांनी केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधितांनी परिश्रम घेतले. अशा शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, अचूकता, वेळेचे नियोजन व सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासास निश्चितच चालना मिळत असल्याचे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले.


