चंद्रपूर- आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात शारीरिक शिक्षण व क्रीडा अभ्यासाचे फार महत्त्व वाढले आहे. आजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवन प्रवासात ताण कमी करण्यासाठी खेळ हा खूप मोलाची मदत करतो. शिस्त व व्यवस्थापन देखील त्यातून अवगत करता येते. तेव्हा त्या अभ्यासक्रमाला प्राथमिकता देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी येथे बोलताना केले.
येथील सरदार पटेल महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग व गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या अब्दुल शफी सभागृहात एक दिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कार्यशाळेचे उदघाटन करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर हे होते, तर यावेळी गडचांदूर येथील शरद चंद्र पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सिंह, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ. सिंकू कुमार सिंह, अंतर्विद्याशाखीय अधिष्ठाता डॉ. संजीव निंबाळकर, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागातील संचालिका व प्राचार्य डॉ. अनिता लोखंडे, डॉ.पुष्पांजली कांबळे, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार व शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. कुलदीप आर. गोंड हे प्रामुख्याने उपस्थित होते. 'शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत आव्हाने, समस्या आणि संधी' या या कार्यशाळेचा विषय होता.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. संजय सिंह यांनी शारीरिक शिक्षण क्रीडा विभाग अभ्यासक्रम महत्त्वाचा असून त्याला 'मायनर' नव्हे तर 'मेजर' विषयात स्थान मिळणे गरजेचे आहे. असे नमूद केले.
आपले अध्यक्षीय भाषणातून बोलताना डॉ. पी.एम.काटकर म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत या कार्यशाळेतून जे काही फलित निघेल, त्याचा फायदा शारीरिक शिक्षण व क्रीडा अभ्यासक्रमासाठी नक्कीच होईल असा आशावाद व्यक्त केला. ही कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रमोद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.
उदघाटन कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक डॉ. कुलदीप आर. गोंड, तर आभार एफ. ई. एस. गर्ल्स. कॉलेजचे संचालक डॉ. आनंद वानखेडे यांनी मानले. कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता प्राध्यापकवृंद शिक्षकेतर कर्मचारी राजेभाऊ इंगोले, हनमंतु डंबारे, नागू कोडापे, निलेश बन्नेवार, दर्शन मेश्राम, गौरव झाडे, राणी गोंड, शालिनी निर्मलकर आणि खेळाडूंनी अथक परिश्रम घेतले.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.
-------
शारीरिक शिक्षण हा शिक्षणाचा अनिवार्य घटक-
प्रथम सत्राचे प्रमुख मार्गदर्शक आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख आणि प्रोफेसर डॉ. सिंकू कुमार सिंग यांनी शारीरिक शिक्षण हा शिक्षणाचा अनिवार्य घटक असून, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक सौहार्द आणि आरोग्यदायी जीवनशैली विकसित करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे असे नमूद केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागातील संचालिका डॉ. अनिता लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेचा विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांतील शारीरिक शिक्षण संचालक, प्राध्यापक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

