भद्रावती तालुक्यातील पिपरी (दे) गावातील पटवारी अनील गहुकर यांनी शेतकऱ्यांकडून शेती जमीनीचे फेरफार करण्यासाठी १० हजाराची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे?
या प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चा (भा.ज.यु.मो) महाराष्ट्र प्रदेश सचिव इम्रान खान यांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
शेतकरी उमेश काकडे यांनी शेतातील फेरफार करण्यासाठी संबंधित पटवारीला मृत्युपूर्वी वडिलाचा आईचा नावावर असलेली अधिकृत शेत जमीनीचे मृत्युपत्र सादर केले होते. मात्र, अनेक दिवसांपासून फेरफारासाठी विचारणा केल्यानंतर पटवारीने फेरफारासाठी १० हजार लाच मागीतली असल्याचे दीलेल्या निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे. ही बाब अत्यंत संवेदनशील असल्यामुळे उमेश काकडे यांनी भा.ज.यु.मो प्रदेश सचिव इम्रान खान यांना कळवले.
यावरून इम्रान खान यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे तात्काळ भ्रष्ट तटवारी अनील गहुकर यांना निलंबित करून CID चौकशीसह जंगम मालमत्तेची देखील तपासणी करण्याची निवेदनातून मागणी सादर केली आहे.
त्याचबरोबर गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशीही मागणी करीत भारतीय जनता युवा मोर्चा पुढे आहे.
हा प्रकार समोर आला की भद्रावतीतील पिपरी (दे) गावात तसेच संपूर्ण शेतकरी वर्गात प्रचंड संतापाची लाट उठली आहे. आपल्या जमिनीचा सरळ हक्क मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून लाच मागणे ही अन्यायाची घटना असून या भ्रष्टाचाराला प्रशासनाने निर्णायकपणे आळा घालण्याची गरज असल्याचे स्थानिक नेते व भावनिक शेतकरी वर्ग यांनी ठळकपणे नमूद केले आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या निवेदनामध्ये महसूल विभागातील कामकाज अधिक पारदर्शक करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचा मुद्दाही मांडण्यात आला आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे आणि जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती पाठवण्यात आली आहे.
भाजप युवा मोर्चाचे तौसिफ शेख, अमर महाकुलकर, राहुल आसुटकर, शिवा कवादार, कृष्णा बोमनवार, उमेश काकडे, अनंत काका गुंडावार, राजेश कांबळे व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्यांनी या भ्रष्टाचाराविरोधात ठोस व साहसी कारवाई होण्याची मागणी केली आहे.

