आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सरदार पटेल महाविद्यालयात योग प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

Chandrapur Media 24



चंद्रपूर : येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग, राष्ट्रीय छात्र सेना विभाग (मुले व मुली) तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी स्व. वामनराव गड्डमवार सभागृह येथे योग प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर होते, तर प्रमुख योग प्रशिक्षक म्हणून चंद्रपूर पतंजली महिला योग समितीच्या रेणुका साठवणे व कविता यलपूरवार उपस्थित होत्या. यावेळी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. पुष्पांजली कांबळे, एनसीसी प्रमुख कॅप्टन डॉ. सतीश कन्नाके, एनएसएस प्रमुख डॉ. उषा खंडाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभागाचे प्रा. विक्की पेटकर, प्राध्यापकवृंद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स, एनएसएस स्वयंसेवक तसेच खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणातून बोलताना प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी योगाचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व विशद केले. नियमित योगाभ्यासामुळे निरोगी जीवनशैली, मानसिक स्थैर्य, सकारात्मक विचारसरणी आणि कार्यक्षमता वाढीस लागते, असे सांगून विद्यार्थ्यांनी योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर योग प्रशिक्षक रेणुका साठवणे व कविता यलपूरवार यांनी विविध योगासने, प्राणायाम, ध्यान आणि श्वसनक्रिया यांचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. त्यांनी योगाच्या माध्यमातून तणावमुक्त जीवन, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक संतुलन कसे साधता येते, याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. सर्व उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग घेत योगाभ्यासाचा लाभ घेतला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या योग प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरास विद्यार्थी, स्वयंसेवक, कॅडेट्स आणि खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. योगाचे महत्त्व जनमानसात रुजविणे आणि निरोगी समाजाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने आयोजित हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तिवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, जीनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.
Tags